***अतीवृष्टी व पिक रोगाने शेत पिक झाले नष्ट, शेतकरी आले अडचणीत ***ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना आर्थीक मदतीचा हात द्या *** आमदार दादाराव केचे यांची मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे मागणी***

आर्वी,दि.११:- अतिवृष्टी व पिक रोगाने खरीप हंगाम धोक्यात आला असुन अनेकांच्या शेतातील पिके नष्ट झाली असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. यातुन त्यांची सुटका करण्याकरीता ओला दुष्काळ जाहिर करुन आर्थीक मदतीचा हात द्यावा अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देवून केली आहे.
या वर्षी खरीप हंगामाची चांगली सुरूवात झाली. अर्ध्या हंगामा पर्यंत पिकाची परिस्थीती चांगली होती. शेतकरी कधी नव्हे तो आनंदी होता. परिवाराकरीता अनेक योजना त्याने आखल्या होत्या. मात्र लहरी निसर्गाने पुन्हा दगा दिला. अतिवृष्टीचा फटका बसला. उन पावसाचा खेळ सुरू झाला. पाऊस आला की लगेच कडक उन पडु लागले. डवरनीला अडथळा निर्माण होवु लागला. परिणामी पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा तर होतच नाही. शिवाय मर रोग, पिवळा मोझॅक आदि रोगांचा मारा सुरू झाला. शेतकऱ्यांकरीता वरदान ठरलेले सोयाबीनचे पिक तर हातातुन निघुन गेले. कापुस व तुर पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती मात्र हे पिक सुध्दा हातुन गेल्यासारखे झाले असल्याने त्यांच्या पुढे जिवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे पाऊस उन्हांच्या लपंडावात संत्रा पिक सुध्दा अडचणीत आले आहे. संत्र्यांच्या मृग बहराला गळती लागल्याने पुर्ण नष्ट झाला आहे. आंब्या बहरवर ते निर्भर आहेत.
किडी व रोगांपासुन पिकाचे संरक्षण करण्याकरीता कृषी खात्याने सांगीतलेल्या उपाय योजना शेतक-यांनी केल्या विविध प्रकारच्या महागड्या औषधींचा वापर केला. तर अनेकांनी उर्वरीत पिकांचा बचाव करण्याकरीता शेतातील बाधीक झाडे उपडुन फेकली मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. यात शेतकऱ्यांचा होता नव्होता तो पैसा खर्च झाल्याने त्याचेवर कफल्क होण्याची पाळी आहे.
जुन महिण्यात झालेली अतिवृष्टी, सुरू असलेला पाऊस उन्हाचा लपंडाव व पिक रोगांचा मारा यामुळे शेती व्यवसायावर निर्भर असलेले विदर्भातील ९० टक्के परिवार आर्थीक अडचणीत आला असुन त्यांच्यासमोर जिवन मरणाचा प्रश्न ठाण मांडून उभा झाला आहे. अशा अवस्थेत ओला दुष्काळ घोषीत करुन शेतकऱ्यांना भरघोष मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्याचे आदर्श व कर्तुत्ववान मुख्यमंत्री म्हणून तसेच आपणाला विदर्भातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणं असल्यामुळे आपणास शेतकऱ्यांची खरी वस्तुस्थिती माहिती आहे. आपण शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या बिकट परिस्थितीचा विचार करून अति पावसामुळे तसेच ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानी साठी त्यांना आर्थिक मदत करण्याचे दृष्टिकोनातून ओला दुष्काळ जाहीर करून दिलासा द्यावा अशी विनंत आमदार दादाराव केचे यांनी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.