जिल्ह्यातील शेवटच्या मोतिबिंदु रूग्णावर शस्त्रक्रिया होई पर्यंत अभियान सुरूच राहणार – जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. पंकज भोयर
पालक मंत्र्यांनी सुध्दा रक्तदाब तपासणी केली. ***

आर्वी, दि.२७:- माझ्या वाढदिवसाला बडेजाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेची कामे करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले होते. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन मोतिबिंदू विरहीत जिल्हा हा अभियान सुरू केला असुन जिल्ह्यातील शेवटच्या मोतिबिंदू रुग्णावर शस्त्रक्रिया होईपर्यंत हे अभियान सातत्याने सुरुच राहील असे आश्वासन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी येथे दिले.
वर्धा जिल्हा सार्वजनीक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री वैध्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने रवीवारी (ता.२७) येथील सहकार मंगल कार्यालयात ‘मोतीबिंदु विरहित आर्वी ‘ या अभियाना अंतर्गत आयोजीत मोतिबिंदु व रोग निदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
या कार्यक्रमाला आमदार सुमित वानखेडे, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, प्रसिध्द हृदय रोग तज्ञ डॉ. अरुण पावडे, माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय गाते, माजी अध्यक्ष सुनील गफाट, वैद्यकीय अधीक्षक डॉ.पुष्पक खवशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेंद्र वर्मा आदी उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करतांना त्यांनी, राज्यातील प्रत्येक नागरिकास विनामूल्य उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरण असल्याची माहिती देवुन, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली आयुष्मान भारत ही योजना क्रांतिकारी ठरली असल्याचे सांगीतले. याच माध्यमातुन जिल्ह्यात देखील नागरीकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे याचा हा एक प्रयत्न असून याची सुरूवात मोतिबिंदू विरहीत जिल्हा अभियान हा उपक्रम राबवुन करण्यात येत आहे असे सांगीतले.
या प्रसंगी आमदार सुमीत वानखेडे यांनी मार्गदर्शन करतांना, प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करुन मोतिबिंदू शस्त्रक्रिया विनामुल्य केल्या जाईल अशी माहिती दिली. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य सेवेची जबाबदारी घेतली असल्याचे सांगुन मोफत आणि उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचा संकल्प शासनाने केला असल्याचे सांगीतले. तर, दुसरीकडे पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला मोतिबिंदू मुक्त करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती देवुन प्रत्येकाला सुंदर जग पाहण्याची संधी या अभियानातून उपलब्ध होत असल्याचे सांगुन पालकमंत्र्यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगीतले. शिबिरात निदान झाल्यानंतर शस्त्रक्रियांची आवश्यक्ता असलेल्या रुग्णांवर गरज पडल्यास अमरावती व नागपूर येथे देखील शस्त्रक्रिया केल्या जातील, असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुमंत वाघ यांनी मांडली. संचालन रविकांत बुरघाटे व गौरी बारहाते यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे यांनी मानले.
पालक मंत्र्यांनी सुध्दा रक्तदाब तपासणी केली.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आमदार सुमीत वानखेडे यांनी फित कापुन या शिबीराचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी रुग्ण तपासणी, औषध वितरण, चष्मे वाटप, आयुष्मान भारत व जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणी, रक्त व इतर आजारांच्या तपासणी कक्षाची पाहणी केली. रुग्णांसोबत संवाद सुध्दा साधला मात्र यावेळी पालकमंत्र्यांना सुध्दा मोह आवरला नाही त्यांनी स्वत:ची देखील रक्तदाब तपसणी करून घेतली.
तपासणी शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिरास तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ९ वाजतापासून नोंदणीस सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी रुग्णांची गर्दी दिसत होती. आरोग्य अधिकारी, कर्मचारी आलेल्या प्रत्येक रुग्णांची नोंदणी करून घेत होते. शिबिरस्थळी तपासणीसाठी पुरुष व महिलांकरीता वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती. दोनही ठिकाणी नोंदणीसाठी प्रत्येकी १० पथके लावण्यात आले होते. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणीसाठी ४ कक्ष, नेत्र तपासणी ५ कक्ष, असंसर्ग आजार, रक्तदाब, मधुमेह तपासणी ५ कक्ष तर सामान्य रुग्ण तपासणी, स्त्रीरोग व वंधत्व तपासणी, दंतरोग तपासणी, ईसीजी, रक्त तपासणी, कर्करोग तपासणी तसेच औषधी व चष्मे वाटपासाठी प्रत्येकी एक कक्ष अशी दोनही ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
शिबीरात तिन हजार ४८० लोकांची तपासणी
पालक मंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतुन साकारलेले हे तिसरे शिबीर असुन या पुर्वी वर्धा व हिंगणघाट येथील शिबीराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला. आर्वीच्या या शिबीराचा तिन हजार ४८० शिबीरार्थींनी लाभ घेतला. यातील दोन हजार ८७४ शिबीरार्थींची मोतीबिंदु तपासणी करण्यात आली यातील ४५४ रुग्ण शस्त्रक्रीयेकरीता पात्र ठरले असुन त्यांचेवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तर, तिन हजार ३७० शिबीरार्थींना मोफत उत्तम प्रतिचे चष्मे देण्यात आले.
व्दिव्यांग विध्यार्थींनीना किसान विकास पत्राचे वितरण
जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या शालेय दिव्यांग विद्यार्थीनींना यावेळी शासनाच्यावतीने अर्थसहाय्य योजने अंतर्गत २५ हजार रुपयाचे किसान विकास पत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरीन करण्यात आले.