बसने दारु तस्करी करणाऱ्या महिलेला पोलीसांनी केले जेरेबंद
३१ हजार २०० रुपयाची विदेशी दारु केली जप्त महिलेस केली अटक

आर्वी,दि.१२:- दारु तस्करी करण्यात महिलांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. वर्धा येथील एका महिलेला पोलीस पथकाने गुरुवारी (ता.११) येथील बस स्थानकावर ३१ हजार २०० रुपयाच्या दारु साठ्यासह अटक केली आहे.
दिवसेंदिवस दारुच्या व्यवसायात महिलांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात सहभाग होत आहे. आधी नवऱ्याच्या दारु व्यवसायाला बायकोचा हातभार लागत असे मात्र आता तर चक्क महिला सुध्दा तस्करी करु लागल्या आहे. ठाणेदार सतिश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात दारु वाहतुकीला आळा घालण्याकरीता येथील पोलीसांनी कंबर कसली आहे. एस.टी. महामंडळाच्या बसने मोठ्या प्रमाणात दारु वाहतुक केल्या जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यांनी गुरूवारी (ता.११) आपला मोर्चा बस स्थानकाकडे वळवीला. बस स्थानकावर एका महिलेच्या हालचालीवरुन संशय आला. ती वरुड- वर्धा बस मध्ये बसणारच एवढ्यात तिला अडवीले तिच्या जवळील सामानाची झडती घेतली. यात त्यांना बॉम्बे स्पेशल व्हिस्कीच्या २४ शिश्या, ऑफीसर चॉईसच्या ४० निपा असा एकुण ३१ हजार २०० रुपयाची विदेशी दारु मिळुन आली. दारु जप्त करुन महिलेला पोलीसांनी अटक केली.
हि कारवाई प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण, ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात अमर हजारे, योगेश चन्ने, इमरान खिलजी, अंकुश निचत, बाबासाहेब गवळी, अमोल गोरटे, विनय मस्के सुरज रिठे भुषण इखर आदिंनी केली.
या प्रकरणी दारु तस्करी करणाऱ्या महिलेवर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद घेवुन अटक केली असुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.