आर्वी तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीचा घोटाळा, कोट्यावधी रुपयाच्या उपकर व तोलाई फी ची झाली चोरी, ७०-३० चा घोळ, सभापतीने मत नोंदवून घेण्यास दिला नकार पत्रकार परिषदेत संचालक गजानन निकम यांचा आरोप, तक्रार सुध्दा केली
परिपत्रकाचे पालन न करता दिली नियुक्ती, खरेदी विक्री संस्थेत घोटाळा?, शेतकरी जिनींग प्रेसींग भुखंड घोटाळा ?, धमकावल्याचा आरोप, शासनाकडे केली तक्रार, ----------तर कुठला हि गैरप्रकार झाला नाही- संदिप काळे यांचे म्हणने

आर्वी,दि.१०:- शेतकरी हिताचा विचार करुन निर्माण केलेल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन ७०-३० टक्केच्या घोळात उपकराची व तोलाई फी च्या कोट्यावधी रुपयाची चोरी होत असल्याचा व सभापतीने मत नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप संचालक गजानन निकम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन लावून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
येथील विश्रामगृहात गुरूवारी (ता.१०) हि पत्रकार परिषद झाली यात गजानन निकम यांच्यासह मनीष उभाळ, अविनश बोबडे, हर्षवर्धन देशमुख, संचालक मधुकर रामाजी सोमकुंवर, गोरसेनेचे ज्ञानेश्वर राठोड, जगताप, प्रभाकर टोपले, रामभाऊ कुंभारे, रणजीत देशमुख, निलेश डाखोडे, जनार्धन देशमुख, वैध्य, जया देवरकर आदि शेतकरी व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य उपस्थीत होते.
शेतकऱ्यांनकडून खरेदी केलेल्या मालावर व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे उपकर भरावा लागतो. मात्र व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या मिलीभगत मुळे यांतील ३० टक्के रक्कमच कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये भरल्या जाते आणी उर्वरीत ७० टक्के रक्कमेचा बटवारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी व पदाधिकाऱ्यामध्ये होत असल्याचा आरोप गजानन निकम यांनी केला असुन या माध्यमातुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपकराची कोट्यावधी रुपयाची चोरी होत असल्याचे सांगीतले. याशिवाय तोलाई फि मध्ये सुध्दा सुमारे ३२ लाख रुपयाचा घोटाळा असल्याची माहिती दिली. याशिवाय सुतगिरणी करीता कृषी उत्पन्न बाजार समिती मधुन ३५ लाख रुपयाची आर्थीक गुतंवणूक करण्याचा इरादा असल्याचा सुध्दा त्यांनी आरोप लावला आहे.
परिपत्रकाचे पालन न करता दिली नियुक्ती
शासनाच्या २०१९ च्या परिपत्रकाचे पालन न करता जवळील व्यक्तीस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहसचिव पदावर नियुक्ती केल्याचा सुध्दा त्यांचा आरोप असुन याची तक्रार झाल्यानंतर सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाने २५ फेब्रुवारीच्या आदेशानुसार हे पद कमी केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
खरेदी विक्री संस्थेत घोटाळा?
आर्वी तहसील सहकारी कास्तकारी खरेदी विक्री संस्थेत सुध्दा मोठा घोटाळा असल्याचे त्यांनी सांगीतले. यात भाडेतत्वावर घेतलेली नझुलची जागा स्व:मालकीची समजुन जुने बांधकाम तोडले आणी व्यापारी हिताचे दुकाने अथवा बांधकाम करण्याचे नियोजन करुन मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा केल्याचा आरोप निकम यांनी लावला आहे. तसेच कृषक शिक्षण संस्था व आर्वी नागरी सहकारी पत संस्था यांच्यासह नियमबाह्यरित्या पोटभाडेकरुन ठेवले कसे? असा प्रश्न सुध्दा यावेळी उपस्थित केला. भुखंड घोटाळाच नव्हे तर सुत गिरणी मध्ये ११ लाख रुपयाची गुंतवणूक केली असल्याची माहिती दिली.
शेतकरी जिनींग प्रेसींग भुखंड घोटाळा ?
शेतकरी जिनींग प्रेसींग फॅक्टरी ली. मध्ये सुध्दा मोठा भुखंड घोटाळा करण्यात आल्याची माहिती देतांना त्यांनी सांगीतले की, अटी व शर्तीचे पालन न करता व्यापाऱ्यांना दिर्घ मुदती करीता जागा भाड्याने देण्यात आल्या. भाडे धारकाकडून प्रत्यक्ष वसुल केलेले भाडे संस्थेत जमा केल्या जाते तर अप्रत्यक्ष भाडे रोखीने केल्या जात असल्याचा आरोप सुध्दा त्यांनी यावेळी लावला.
धमकावल्याचा आरोप
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेचे इतीवृत्त जेव्हाचे तेव्हाच लिहील्या गेले पाहिजे असे नियम आहेत. दिनांक पाच एप्रीलला समितीची सर्व साधारण सभा झाली या सभेत विषय क्रमांक ४, विषय क्रमांक ५, व विषय क्रमांक ६ वर चर्चा सुरू असतांना मांडलेल्या मताची नोंद घेण्याचा आग्रह धरला तसे लेखी पत्र सुध्दा दिले मात्र त्याची नोंद घेतल्या गेली नाही उलट सभापती यांनी तुमचे मत घेणार नाही असे फोनवरुन धमकावल्याचा आरोप सुध्दा यावेळी गजानन निकम यांनी केला आहे.
शासनाकडे केली तक्रार
संदिप काळे हे बाजार समितीचे सभापती असुन खरेदी विक्री व जिनींग प्रेसिंग फॅक्टरीचे पदाधिकारी सुध्दा आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन आर्थीक लाभ संपादन केला व भुखंड घोटाळा केला, स्वत:च्या सुतगीरणीस संस्थेकडून भाग खरेदी केले. अवैधरित्या सहसचिव, मॅनेजर यांची पदभरती केली. एका कर्मचाऱ्याला दोन संस्थेतुन पगार दिला जातो असेही आरोप प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातुन लावले असुन याची तक्रार शासनाकडे केल्याची माहिती दिली आहे.
कुठला हि गैरप्रकार झाला नाही- संदिप काळे
आर्वी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती. आर्वी तहसील सहकारी कास्तकारी खरेदी विक्री संस्था, जिनींग प्रेसींग आर्वी, या तिन्ही माझ्याशी संबंधीत असणाऱ्या संस्थांमध्ये कोणताही गैरप्रकार तसेच कुठलीही अनियमीतता नाही. तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुतगिरणीचे जमा होत असलेले भागभांडवल शासकीय नियमाच्या अधीन राहुन सुरु आहे. संस्था तसेच माझ्यावर होत असलेले आरोप हे सहकार क्षेत्राच्या विकासाला खीळ बसावी या हेतुने प्रेरीत होऊन व माझ्यावर असलेल्या राजकीय आकसापोटी केलेले आहे. मी सध्या राज्याबाहेर असल्यामुळे दि १५ एप्रिल २०२५ नंतर पत्रकार परिषदेतून सवीस्तर उत्तर देईन अशी माहिती सहकार नेते संदिप काळे यांनी दिली आहे.