१२ दुकानावर धाडसी दरोडा प्रकरणी आरोपी पोलीसांच्या अवाक्यात दोन लाख ५५ हजार पाचशे रुपयावर केला हात साफ
खासदार अमर काळे यांनी घटनास्थळाला दिली भेट, नेहरु मार्केट मध्ये गस्तीपथक शिरतच नाही

आर्वी,दि.१०:- पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी कोणत्याही शस्त्राचा अथवा साहित्याचा वापर न करता रवीवारी (ता.नऊ) रात्री अवघ्या दिड तासात १२ दुकानाचे शटर तोडून नगदी व एैवजासह दोन लाख ५५ हजार ५०० रुपयावर हात साफ केला. या प्रकरणी ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पोलीसांची दोन पथके आरोपींचा शोध घेत असुन आरोपी पोलीसांच्या अवाक्यत असल्याची माहिती मिळाली आहे. येथील मुख्य बाजारपेठ म्हणुन गणल्यागेलेल्या नेहरु मार्केट मध्ये हि घटना घडली आहे.
शनिवारी (ता.आठ) दुकाने बंद करुन घरी गेल्या नंतर रवीवारी (ता.नऊ) रात्री एक वाजताचे सुमारास पाच ते सहा आरोपी दोन मोपडवरुन नेहरु मार्केट मध्ये आले. त्यांनी फक्त किराणा दुकानाला लक्ष केले. ज्या दुकानाच्या शटरला मध्य कुलूप नाही त्याच दुकानाच्या शटर खालील फटीत हाताचा पंजा टाकुन मध्यभागातुन वाकवुन तिन ते चार फुटा पर्यंत वर उचलले आणी तिन लोक आत शिरले तर बाकीच्यांनी कमजोर शटर असलेल्या दुकांनाचा माग काढला तो पर्यंत १२ दुकाने त्यांनी हेरली. दुकानातील किराणा मालाला त्यांनी हात लावला नाही मात्र गल्ला फोडुन आतील नगदी रुपये व चिल्लर एका थैलीत भरुन पलायन केले या करीता फक्त दिड तास त्यांनी घेतले. हे सर्व सिसिटीव्ही मध्ये कैद झाले.
यात जगदीश लालावाणी यांच्या दुकानातुन एक लाख ३५ हजार रुपये, अनील वधवा यांचे २५ हजार रुपये, प्रकाश गुल्हाणे यांचे सात हजार रुपये, हरुमल ठाकुर यांचे पाच हजार रुपये, रवी ठाकुर यांचे १० हजार रुपये, धनपतलाल टावरी यांचे सात हजार रुपये, शेख मोहसीन यांचे १० हजार रुपये, अवीनाश कोटवाणी यांचे चार हजार रुपये, नरहरी बागवाले यांचे पाचशे रुपये तर, प्रमोद अग्रवाल यांचे १२ हजार रुपये व ४० हजार रुपये किमंतीची अर्ध्या ताळ्याची चैन असा एकुण दोन लाख ५५ हजार पाचशे रुपयाच्या रोकड व दागीण्यावर चोरट्यांनी हात साफ केला. याची तक्रार जगदीश जेठानंद लालवाणी यांनी केली आहे.
याप्रकरणी स्थानीक गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक खेमसींग कोहचाडे, दिगांबर रुईकर, योगेश चन्ने, निलेश करडे, अमर हजारे, आदिंनी ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला आणी दुकानदारांकडून संपुर्ण माहिती गोळा केली. तर दुसरी कडे वर्धा येथील डॉग पथक यांना सुध्दा बोलावण्यात आले होते मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ठसे तज्ञाना सुध्दा पाचरण करण्यात आले होते. त्यांनी प्रत्येक दुकानात जावुन ठश्याचे नमुने गोळा केले आहे. पोलीसांची दोन शोध पथके तयार करुन आरोपींचा माग काढणे सुरू असुन आरोपी पोलीसांच्या अवाक्यात असल्याचे कळते. लवकरच ते पोलीसांच्या हाती लागण्याची शक्यत बळावली आहे.
खासदार अमर काळे यांनी घटनास्थळाला दिली भेट
दरोड्याची माहिती मिळताच खासदार अमर काळे यांनी घटनास्थळाला भेट देवुन व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह दुकानदारांची सुध्दा भेट घेतली. त्यांच्याकडून घटनेची संपुर्ण माहिती घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार सतीश डेहणकर यांच्यासोबत संपर्क साधुन या प्रकरणाचा तातडी तपास करुन आरोपींना अटक करा असे निर्देश दिले शिवाय अवैध्य धंदेवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे व नेहरु मार्केटच नव्हे तर संपुर्ण शहरात रात्रीची गस्त वाढवीण्याच्या सुचना दिल्या
नेहरु मार्केट मध्ये गस्तीपथक शिरतच नाही
इंग्रज काळापासुन शहराची मुख्य बाजार पेठ असलेल्या नेहरु मार्केट मध्ये ठोक विक्रेत्यांची दुकाने आहेत येथे दररोज हजारो रुपयाचा व्यवहार होतो. रात्री ११ वाजे पर्यंत ही बाजार पेठ गजबजलेली असते. त्यानंतर पोलीसांच्या हवाली असते मात्र चारचाकी वाहनाने रात्री फिरणारे गस्तीपथक आत भाग निमुळता असल्याने मध्ये शिरत नाही मात्र मार्केटच्या चारही बाजुने चकरा मारतात. याचाच लाभ उचलत आरोपींनी बिनधास्तपणे १२ दुकानाचं शटर शहाजोगपणे वर करुन दोन लाख ५५ हजार पाचशे रुपयाच्या मालावर हात साफ केला. पोलीसांजवळ गस्तीकरीता शासनाच्या चार दुचाकी आहेत याचा उपयोग सातत्याने केला असता तर कदाचीत चोरटे रंगेहात सुध्दा सापडु शकले असते अशी चर्चा आहे.