रस्ता बांधकामाला अडथळा ठरणारी मंदिरे प्रशासनाने तोडली
दुकानदारांची अतिक्रमणे कधी काढणार

आर्वी,दि.४:- केंद्रीय महामार्ग बांधकाम विभागाने शुक्रवारी (ता.तिन) पोलीसांच्या मदतीने तळेगाव (शा.पं.) पुलगाव महामार्गाच्या बांधकामाला अडथळा ठरणारी शहरातील मंदिरे प्रशासनाने तोडली. मात्र दुसरीकडे दुकानांना अभय दिल्याची चर्चा असुन ते केव्हा काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तळेगाव (शा.पं.)-पुलगाव या महामार्गाचे बांधकाम २०१७ पासुन अडथळ्याची शर्यत पार करीत धिम्यागतीने सुरु आहे. या बांधकामाला अडथळा ठरत असलेल्या शहरातील पंचायत समिती ते बसस्थानका पर्यंतच्या मातामाय, हनुमानजी, भोल शंकर आदिंची बांधलेली मंदिरी केंद्रीय महामार्ग बांधकाम विभाग नागपुरचे कार्यकारी अभियंता संजीव जगताप, कनिष्ठ अभियंता कुमेरी इनामदार, नवीस इनामदार, ऋशीकेश सातपुते यांच्या मार्गदर्शनात, ठाणेदार यशवंत सोलसे व पोलीस ताफ्याच्या मदतीने तोडण्यात आली आहे. विकास कामाला मदतीचा हात देत नागरीकांनी, भावीकांनी, भक्त गणांनी यात कोणताच अडथळा आणला नाही तर, मंदिरातील मुर्त्या भक्तीभावने स्वत: काढल्या आणी विकास कामाला मदत केली.
मात्र दुसरीकडे याच मार्गावर बांधकाम विभागाची कोणतीही मंजूरी न घेता व्यापाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मंजूरीने आपली प्रतिष्ठाने बांधलेली आहे. हि प्रतिष्ठाने भविष्यात वाहतुकीला अडथळा ठरु शकत असल्याने ती केव्हा काढण्यात येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी व्यापाऱ्यांची पर्यायी व्यवस्था सुध्दा केल्या जावी अशी ही अपेक्षा नागरिकांची आहे.